शरद पवार गटात संघर्ष : कार्याध्यक्ष पदावर राजेंद्र चौधरींचा दावा

वरणगाव-दत्तात्रय गुरव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षातर्फे कार्याध्यक्ष निवडीवरून संघर्ष रंगला असून या पदासाठी पक्षाचे येथील नेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी दावा ठोकून मोर्चेबांधणी केल्याचे समोर आले आहे.

काल पासुन सोशल मिडिया वर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष पदी प्रमोद पाटील यांची नियुक्ती झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या नंतर देखिल अद्याप पर्यंत अधिकृत नियुक्ती पत्र समोर आलेले नाही. त्यांची नियुक्ती जवळपास निश्चित असली तरी रावेर लोकसभा मतदार संघाच्या जबाबदारी वरून राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्षाची सुरुवात गेल्या दोन -दिवसांपासुन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार एकनाथ खडसे यांचे समर्थक असलेले अतुल पाटील यांना रावेर लोकसभा मतदार संघाच्या मोठ्या पदावर बसवण्यासाठी त्यांचा गट आग्रही असल्याचे समजते.

दरम्यान, माजी मंत्री.गुलाबराव देवकर, माजी मंत्री. डॉ. सतिश पाटील, अरुणभाई गुजराती, माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, श्रीराम पाटील तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुका अध्यक्ष यांनी एकमताने जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांचे नाव सुचवल्या नंतर त्यांची नियुक्ती 24 जुलै रोजी जवळ जवळ निश्चित मानली जात होती. तथापि, खडसे यांच्या गटाने त्यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.

राजेंद्र विश्वनाथ चौधरी हे पक्षाचे आधिपासूनचे म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासूनचे पदाधिकारी असून मध्यंतरी अनेकदा पक्ष अडचणीत आला असतांना देखील त्यांनी साथ सोडली नाही. यामुळे त्यांनी आता पक्षाच्या माध्यमातून मोठे पद मिळावे अशी अपेक्षा केली असून नेते आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या नावाला पाठींबा दिल्याचे वृत्त आहे. यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये या पदावर नेमकी कुणाची वण लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Protected Content