मुंबई वृत्तसंस्था । आज थर्टीफर्स्ट आणि नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आलेय. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची सगळीकडे करडी नजर असणार आहे. यानिमित्त ठिकठिकाणी होणारी गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत थर्टी फर्स्टसाठी ४० हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर बंदोबस्ताला तैनात असणार आहेत.
नववर्ष स्वागताच्या बंदोबस्तात स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या बरोबरीला शहरातील विविध भागात सशस्त्र दल, राज्य राखीव बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बी.डी.डी.एस. विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि होमगार्ड यांच्यामार्फत देखरेख ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या माध्यामातूनही विविध ठिकाणी पोलिसांची नजर राहणार आहे.
नववर्षांच्या निमित्ताने दरवर्षी हजारो लोक रात्री घराबाहेर पडतात. त्यामुळे रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाणार असून महिलांसोबत छेडछाडीच्या घटना घडू नयेत यासाठी विशेष पथके साध्या वेषात आणि वर्दीत नेमण्यात आली आहेत. तसेच समुद्रकिनारी दुर्घटना घडू नये यासाठी बोटींद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून हॉटेल आणि लॉजचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच बार आणि हॉटेल पार्टीवरही पोलिसांची नजर राहणार आहे.