धक्कादायक…सावरकर दहशतवादी असल्याचा पुस्तकात उल्लेख

नागपूर (वृत्तसंस्था)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कला शाखेतील द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकात स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर हे दहशतवादी असल्याचा उल्लेख असल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या चुकीच्या संदर्भावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला असून आक्षेपार्ह मजकूर काढण्याची मागणी केली आहे.

इतिहासाच्या पुस्तकात ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ या धड्यात वीर सावरकरांसह वासुदेव बळवंत फडके, पंजाबचे रामसिंह कुका, लाला हरदयाळ, रासबिहारी बोस आदींच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांची भूमिका महत्वाची होती. मात्र, त्यांनी उभारलेल्या चळवळीचा उल्लेख ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ असा केला आहे. त्यावर अभाविपने आक्षेप घेतला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले. त्यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख करणे चुकीचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. हा धडा अभ्यासक्रमातून हटवून या चुकीबद्दल विद्यापीठाने माफी मागावी, तसेच हा धडा अभ्यासक्रमातून हटवण्यात यावा, अशी मागणी अभाविपचे कार्यकर्ते वैभव बावनकर यांनी केली आहे. आम्हाला कोणताही वाद नकोय. त्यात नक्कीच सुधारणा करण्यात येईल,’ असे विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. वायूनंदन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Add Comment

Protected Content