जळगाव प्रतिनिधी । डॉक्टरांच्या संरक्षणासाठी केंद्रीय कायदा बनविण्याच्या मागणीसाठी आज इंडियन मेडिकल असोसिएशनने सकाळी सहा वाजेपासून संप पुकारला असून यामुळे रूग्णांची गैरसोय होणार आहे.
कोलकाता येथे दोन डॉक्टरांना मारहाण झाल्याचे प्रकरण आता मोठ्या प्रमाणात तापले आहे. या घटनेचा देशभरात निषेध करण्यात आला आहे. याशिवाय, आता केंद्रीय पातळीवरून वैद्यकीय व्यावसायिकांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी आज आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने एक दिवसाचा देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला सकाळी सहा वाजेपासून प्रारंभ झाला असून यात ओपीडी बंद ठेवण्यात आलेली आहे. यामुळे रूग्णांची गैरसोय होणार आहे. या संपातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलेले आहे. तथापि, हा बंद तब्बल २४ तास म्हणजे सोमवारी सकाळी सहा ते मंगळवार सकाळी सहा या दरम्यान असल्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय होणार आहे.