Home राजकीय अजनाड बचत गट घोटाळ्यातील आरोपींवर कठोर कारवाई करा ; विधानपरिषदेत आ. एकनाथ...

अजनाड बचत गट घोटाळ्यातील आरोपींवर कठोर कारवाई करा ; विधानपरिषदेत आ. एकनाथ खडसेंची मागणी

0
254

नागपूर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील अजनाड येथील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि कर्ज सुविधा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ९० लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या आर्थिक फसवणुकीस जबाबदार आरोपींवर तातडीने व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली.

आमदार खडसे म्हणाले की, अजनाड येथील महिला बचत गटाची रक्कम व्यक्तिगत फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार २२ ऑगस्ट २०२५ च्या सुमारास उघड झाला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या बचत गटातील निधीचा अशा पद्धतीने दुरुपयोग होणे अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याबाबत आतापर्यंत केलेल्या चौकशीचा अहवाल सभागृहासमोर सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

आ. खडसे यांनी पुढे सांगितले की, चौकशीत उघड झालेल्या तथ्यांच्या आधारे संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात अशा गैरव्यवहारांना प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे शासनाने या प्रकरणात कठोर भूमिका घेऊन आरोपींना गाठावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या उत्तरात सांगितले की, अजनाड महिला बचत गटाच्या निधीचा सुमारे ९० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(४) आणि ३१६(२) अन्वये २० ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा क्रमांक ३४८/२०२५ नोंदविण्यात आला आहे. तपासादरम्यान एक आरोपी निष्पन्न झाला असून तो अद्याप फरार आहे. त्याच्या अटकपूर्व जामिनास न्यायालयाने नकार दिला असून पोलिसांचा त्याच्या शोधासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली की, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आदेशानुसार १९ सप्टेंबर २०२५ रोजी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करता तपास जलद गतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 


Protected Content

Play sound