पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, नागरिकांनी सक्रियपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने पाचोरा शहरात मतदार जनजागृतीसाठी आकर्षक पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, मतदानाचा हक्क अनिवार्यपणे बजावण्याचा संदेश सर्वदूर पोहोचला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि राजे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे पथनाट्य सादर करण्यात आले. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीची गरज अधोरेखित करण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाला पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, करअधिकारी डी.एस. मराठे यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पथनाट्यासाठी गो.से. हायस्कूलच्या इयत्ता ८वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिक्षक महेश कौडिंण्य यांच्या संकल्पनेतून मतदार जनजागृती पथनाट्याची निर्मिती करण्यात आली होती. सादरीकरणादरम्यान विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील सहभागाची गरज आणि सुजाण नागरिकत्वाचा संदेश प्रभावीपणे मांडला. पथनाट्याच्या पार्श्वभूमीला हायस्कूलचे शिक्षक व तबला वादक सागर थोरात यांनी दिलेल्या प्रभावी तबला वादनामुळे सादरीकरण अधिक आकर्षक झाले.
विद्यार्थ्यांच्या या प्रभावी अभिनयामुळे नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी पथनाट्यादरम्यान विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मतदान जागृतीसाठी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश देवरे यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत जास्तीत जास्त नागरिकांनी २ डिसेंबर रोजी मतदान केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन केले. त्यांनी मतदान हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ असून प्रत्येकाने जबाबदारीने त्यात सहभागी व्हायला हवे असे नमूद केले.
शेवटी, पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी निर्माण केलेला जनजागृतीचा संदेश शहरभर पोहोचला असून, मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत उत्साहाने सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



