Home आंतरराष्ट्रीय होर्मुज सामुद्रधुनी अमेरिका-इस्रायलसाठी बंद ; भारताला दिला सुरक्षित मार्ग

होर्मुज सामुद्रधुनी अमेरिका-इस्रायलसाठी बंद ; भारताला दिला सुरक्षित मार्ग


तेहरान वृत्तसेवा । मध्य आशियातील वाढत्या युद्धसदृश परिस्थितीचा परिणाम आता जागतिक समुद्री व्यापारावरही दिसू लागला असून जगाच्या ऊर्जा पुरवठ्याची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीबाबत इराणने मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. इराणने अमेरिका, इस्रायल आणि काही पाश्चिमात्य देशांसाठी हा महत्त्वाचा जलमार्ग बंद करण्याची घोषणा केली असली तरी भारत आणि चीनच्या जहाजांना मात्र या मार्गावरून सुरक्षितपणे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे जागतिक तणावाच्या वातावरणात भारतासाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सकडून गुरुवारी अधिकृत घोषणेद्वारे ही माहिती देण्यात आली. इराणच्या सरकारी प्रसारक वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात अमेरिका, इस्रायल, युरोप किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचे कोणतेही जहाज या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर थेट हल्ला करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. युद्धजन्य परिस्थितीत या जलमार्गावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार इराणला असल्याचा दावा देखील इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी ही पर्शियन गल्फमधील देशांसाठी जगाशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग मानला जातो. जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी जवळपास २० टक्के तेल या मार्गातून वाहतूक केले जाते. त्यामुळे या मार्गावरील कोणतीही नाकेबंदी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी गंभीर परिणाम घडवू शकते. सध्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रारंभी हा मार्ग केवळ चीनसाठी खुला ठेवण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता इराणने भारतालाही या निर्बंधातून वगळले आहे. त्यामुळे भारताच्या तेल आयातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी झाली आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भारतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे, कारण देशातील मोठ्या प्रमाणातील कच्चे तेल आयात या समुद्री मार्गावर अवलंबून असते.

विशेष म्हणजे इतिहासात यापूर्वी इतकी कडक नाकेबंदी कधीच करण्यात आलेली नव्हती. १९८० ते १९८८ दरम्यान झालेल्या इराण-इराक युद्धाच्या काळातही या सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्णपणे थांबली नव्हती. मात्र अलीकडे अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर इराणने हा मार्ग व्यावसायिक जहाजांसाठी बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आधीच दिसू लागला असून दुबई आणि कुवैतच्या किनाऱ्याजवळ अनेक तेलवाहू जहाजे आणि टँकर्स थांबलेली असल्याचे सॅटेलाइट डेटामधून स्पष्ट होत आहे. होर्मुज जलमार्गावर अवलंबून असलेले दुबईचे जेबेल अली बंदर हे जगातील दहावे सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल मानले जाते. या मार्गावरील अडथळ्यामुळे आशिया आणि युरोपमधील व्यापारावर मोठा ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जागतिक स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना भारताला दिलेली विशेष सवलत ही दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंधांचे महत्त्व अधोरेखित करणारी मानली जात आहे. ऊर्जा पुरवठा कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे भारताच्या इंधन बाजाराला मोठा धक्का बसण्याची भीती काही प्रमाणात कमी झाली आहे.


Protected Content

Play sound