अमळनेर (प्रतिनिधी) येथील गांधलीपुरा परिसरातील सेक्सवर्कर महिलांवर काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. पोलीस प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल केले जातात. तर काही गुन्हेगार व राजकीय मंडळीकडून नेहेमी खोटे अर्ज केले जातात. अगदी मारहाण होत असल्याची व्यथा देखील सेक्सवर्कर महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेरमधील सेक्स वर्कर महिला अतिशय निराशमय झालेल्या आहोत. मागील २-३ वर्षापासून मुली तस्करीच्य खोट्या केसेस सतत आमच्यावर दाखल होत आहेत. मागील महिन्यात आमच्या एका भगिनीला तिच्या राहत्या घरातून घेऊन जाण्यात आले आणि तिच्यावर धंदा करणाऱ्या बाईच्या कमाईवर जगणारी व्यक्ती म्हणून गुन्हा दाखल करणे,ही अत्यंत दर्दवी बाब आहे. आतापर्यंत अशा प्रकारे अनेक महिलांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. सतत पोलिसांना स्थानिक गुन्हे व राजकारणी यांच्या कडून अर्ज करण्यात येतात व त्यांच्या राजकीय खेळीचा भाग म्हणून महिलांना हिंसेला सामोरे जावे लागते. स्थानिक लोक बायकांवर अन्नाय अत्याचार करतात, दहशत माजवतात, मारहाण करतात. अनेक वेळा स्थानिक अधिका-यांना व राजकाऱ्यांना आम्ही विनंती केली. परंतु सेक्सवर्कर महिलांवरची हिंसा कमी व्हायची ऐवजी वाढली आहे. पुण्याची फ्रिडम नावाच्या संस्थेने सुरुवातीला महिलांचे नाव रेडसाठी सांगितले. अनेक महिलांना वाहतुकीच्या गुन्ह्यात अटक केली गेली.
महाराष्ट्र सगळीकडे ज्या प्रौढ बायका संमतीने धंदा करतात, त्या बायका जागा वापरायला दिली म्हणून हिस्सा देतात. पकडलेल्या महिलांना पोलीस स्टेशन येथे ठेवतात व नंतर मेडिकल जेलमध्ये टाकले जाते. आज पर्यंत एकही अल्पवयीन मुलगी वस्तीत सापडलेली नाही. गांधलीपुरा भागातील नदीकिनारा येथील सेक्स वर्कर महिलांना अमानवीय पद्धतीने वागणूक दिली जात आहे. त्यांची घरे जाळून टाकले गेली आहेत.एवढेच नव्हे तर, त्यांना पोलीस अतिशय गलिच्छ व अश्लील शिव्या देऊन अनेक वेळा मारहाण देखील करतात. अशा दहशतीच्या वातावरणाला व सतत होणा-या हिंसेला आम्हाला सामोरे जावे लागत असून महिलांच्या जगणाच्या व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपण या प्रश्नाची दखल घेऊन सहकार्य करावे, अशी पत्राद्वारे मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.