मुक्ताईनगर प्रतिनिधी । जिल्ह्यातील फळ पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा, अशा मागणीचे निवेदन डॉ. विवेक सोनवणे यांच्यातर्फे तहसीलदार यांना देण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण जिल्ह्यात विमा कंपन्यांच्या विरोधात तीव्र जनआक्रोश आंदोलन करणार असा इशारा निवेदनावेळी देण्यात आला आहे.
पीक विमा कंपन्यांनी २०२०-२१ चा फळ पीक विमा हा अत्यंत तुटपुंजा अश्या पद्धतीने जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करायला सुरुवात केलेली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या चक्रीवादळात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे १००% नुकसान झालेले असून शासनाच्या आदेशानुसार हेक्टरी ६४ हजार मदत मिळणे बंधन कारक असताना पिक विमा कंपन्यांनी बहुतांश ठिकाणी नुकसानीची टक्केवारी ही कमी दाखवून शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाची मदत केल्याचे दिसून येत आहे.
बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी पिक विमा कंपन्यांच्या नियमानुसार नुकसानी नंतर तात्काळ तक्रार नंबर वर तक्रार नोंदवून सुद्धा बहुतांशी शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नसून आज पिक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सांगत आहेत की आता सामूहिक पंचनामे करून व मदत देऊ विशेष खेदाची बाब म्हणजे शासन आदेशानुसार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम ही 5 सप्टेंबरच्या आधी शेतकऱ्यांना मिळणे बंधनकार असून सुद्धा पिक विमा कंपन्या शासन आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे.
याचा अनुभव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार येत असून २०१९_२०२० च्या पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम आजतागायत बहुतांश शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे चक्रीवादळामुळे झालेल्या १०० % नुकसानीचे सरसकट हेक्टरी ६४ हजार प्रमाणे मदत जाहीर करून पीडित शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मात्र, मागणी मान्य न झल्यास जिल्हाभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण जिल्ह्यात विमा कंपन्यांच्या विरोधात तीव्र जनअक्रोश आंदोलन करणार असा इशारा डॉ. विवेक सोनवणे यांनी निवेदनावेळी दिला आहे. यावेळी प्रमोद सौंदळे बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी, शेतकरी सुरेश पाटील, अमोल वैद्य, हेमंत पाटील, अनिकेत सोनार उपस्थित होते.