यावल (प्रतिनिधी)। महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा लागू झाला असतांनाही जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात अवैधरित्या चालू असलेली गोहत्या, गोवंशियांची तस्करी त्वरित बंद करण्याबाबत यावल येथील नायब तहसीलदार यांना विश्व हिंदू परिषदेच्यवतीने निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर, नामदेव कोळी, चेतन भोईटे, उज्ज्वल कानडे, अविनाश बारसे, अमोल पाटील, मयुर पाटील, प्रवीण बडगुजर, प्रदीप पाटील, अक्षय बारी, सुधाकर धनगर आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्रात हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गोमातांची तसेच गोवंशियांची हत्या तसेच तस्करी यांवर कायद्याने बंदी आहे. असे असतांनाही यावल तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे गोवंशियांची कत्तल सर्रासपणे केली जात आहे. ईदसारख्या सणांच्या वेळीही मोठ्या प्रमाणात गोवंशियांची कत्तल केली जाते. तसेच मांसविक्रीसाठी घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून मांसविक्री केली जात आहे. यावल तालुक्यात तसेच यावलमधील मार्गांचा वापर करून गोवंशियांची तस्करी केली जात आहे. तसेच मागील काही महिन्यांत गोवंशियांची चोरी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या सर्व घटनांमध्ये पोलीसांकडून आवश्यक साहाय्य मिळत नसल्याने आपण स्वतः जातीने लक्ष घालून यावर उपाययोजना काढावी.
शनिवार ९ मार्च २०१९ या दिवशी अशीच एक गाडी क्र. (एमएच 20 बीटी 3188) गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक करत असतांना काही जागृत युवकांनी थांबवली व त्यांच्याकडे गोवंशियांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणार्या कागदपत्रांची मागणी केली. ही कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याने त्यांना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन जाण्यास त्या युवकांनी सांगितले. तेव्हा गाडीसोबत असलेल्या युवकांनी त्यांच्या अन्य साथिदारांना बोलावून गाडी थांबवणार्या युवकांशी हुज्जत घालण्यास चालू केले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी पोहोचले आणि त्यांनी सर्वांना पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. पोलीस स्टेशनला जातांनाच मध्येच बाजाराच्या गर्दिचा लाभ घेत गोवंश घेऊन जाणारी गाडी पसार झाली. त्यावर पोलीसांनी काहीच हरकत घेतली नाही. उलटपक्षी गाडी थांबवणार्या एका युवकावरच दंगलीचा गुन्हा दाखल केला. यासंदर्भातील वृत्तही अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहेत. ही वृत्तपत्रे सोबत जोडली आहेत. पोलीसांचे हे कृत्य संशय निर्माण करते. कोणतीही गोवंश वाहतुकीची कागदपत्रे नसलेले वाहन जाऊच कसे दिले ? यात पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का ? अथवा प्रशासनातील काही अधिकार्यांचे गोतस्करांशी साटे-लोटे आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी आम्ही आपलेकडे आमच्या मागण्यांचे हे निवेदन घेऊन आलो आहोत.
या निवेदनाद्वारे या केल्यात मागण्या
१. यावल तालुक्यात चालणारे अवैध कत्तलखाने बंद करावेत, तसेच अवैधरित्या होणारी गोवंशियांची कत्तल थांबवावी, ही कत्तल करणार्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी. २. यावल तालुक्यातून होणारी गोवंशियांची तस्करी रोखावी, तसेच तस्करी करणार्यांवर कठोर कारवाई करावी. ३. दिनांक
९ मार्च २०१९ च्या घटनेत पसार झालेल्या गाडीच्या मालक तसेच संबंधित यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ४. वरील सर्व गोष्टींमध्ये कर्तव्यात चुकारपणा करणार्या पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी.