डांभुर्णी येथे दगडफेक – एका महिलेसह चार जखमी…

पाचोरा, प्रतिनिधी |डांभुर्णी ता.पाचोरा येथे घर बांधकामाच्या कारणाहून दोन गटात दगडफेक झाल्याने यात एका महिलेसह चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

घटनेप्रकरणी प्रभारी सरपंचासह सहा जणांवर हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर कलमांमध्ये वाढ होऊन ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल होण्याची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. सदर घटना रविवार, दि.०५ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान घडली असून घटनेविषयी पिंपळगाव (हरे.) पोलिसात सोमवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश खोंडे हे करीत आहेत.

डांभुर्णी ता. पाचोरा येथील पदमसिंग रामसिंग परदेशी यांचे नवीन घराचे बांधकामासाठी रविवारी सकाळी ९:३० च्या दरम्यान चिंचपुरे येथील कारागीर आले होते. दरम्यान येथील प्रभारी सरपंच संतोष नवलसिंग परदेशी, अजय ईश्वर परदेशी, उज्वला संतोष परदेशी, अलका ईश्वर परदेशी, ईश्वर विठ्ठल परदेशी, नवल शामसिंग परदेशी यांनी सदर घराचे बांधकाम हे अतिक्रमण भागात असून ते तुम्ही करू नका असे सांगितले.

ते असे सांगत असतांना घरमालकाचा २० वर्षाचा शाळकरी मुलगा निलेश पदमसिंग परदेशी हा आम्ही आमच्या जागेतच बांधकाम करीत आहोत तुम्ही कारागिरांना असे का बोलता ? असे सांगण्यासाठी गेला असता संतोष नवलसिंग परदेशीसह इतर पाच जणांनी त्यास शिवीगाळ करून हातातील दगड उजव्या डोळ्यावर मारून फेकला. त्यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर मार लागला. याशिवाय संशयित आरोपींनी हातात दगड घेऊन अलकाबाई पदमसिंग परदेशी, छोटुराम रामचंद्र परदेशी यांना मारहाण करीत असतांना भांडण सोडविण्यासाठी निलेश परदेशी यांचा चुलत काका जीवन बाबूसिंग परदेशी यांच्याहीडोक्यावर दगड मारल्याने डोक्याला सात टाके पडले आहेत.

छोटुराम परदेशी व अलकाबाई परदेशी यांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले. घटनेप्रकरणी दि. ६ रोजी सोमवारी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस ठाण्यात निलेश पदमसिंग परदेशी यांनी अजय ईश्वर परदेशी, उज्वला संतोष परदेशी, अलका ईश्वर परदेशी , ईश्वर विठ्ठल परदेशी, संतोष नवल परदेशी व नवल शमसिंग परदेशी यांच्या विरुद्ध हाणामारीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र जखमींची वैद्यकिय अहवाल आल्यानंतर गुन्ह्याच्या कलमात वाढ होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Protected Content