धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात गुरूवाारी सायकाळी बॅनर फाडण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत १५ पोलीस कर्मचारी आणि नागरीक जखमी झाले आहेत. याप्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली असून १५० ते २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या परिस्थीती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी दिली.
बॅनर फाडण्यावरून झाला वाद
आदीवासी दिनाचा बॅनर फाडल्याने सांगवीत गुरूवारी दोन गटात वाद निर्माण झाला होता. जाब विचारण्यासाठी एक गट गेला, त्यांना मारहाण झाली. त्यानंतर सांगवी, सारणपाडा या दोन गावांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत दगडफेक झाली. यात गाड्याचे नुकसान होवून १५ पोलीस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक नागरीक जखमी झाले आहे. स्थानिक नागरिकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलीसांनी काढला रूट मार्च
दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी रुट मार्च काढला आहे. गावातील सर्व व्यवहार बंद आहे. दुकानं बंद असून संचारबंदीसारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
नागरीकांमधील भिती कमी करण्यासाठी गावातून रूट मार्च काढण्यात आला. स्थानिक जिल्हा पोलिसांसोबतच दंगल नियंत्रण पथक आणि एसआरपीएफची कंपनी या रुट मार्चमध्ये सहभागी आहे. परिस्थिती जरी तणावपूर्ण असली तरी पोलिसांच्या १०० टक्के नियंत्रणात आहे. अशीमाहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.