जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लघूशंका उडाल्याच्या कारणावरुन चार जणांच्या टोळक्याने शेख जूनेद शेख मकदूम (वय २४) याला मारहाण केली. या कारणावरुन दोन गटात वाद होवून दगडफेक होवून तणाव निर्माण झाला होता. ही घटना ममुराबाद रोडवरील हनुमान मंदिराजवळ घडली होती. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तालुका पोलिसांकडून या घटनेची अदखलपात्र गुन्ह्याची नोंदीवर बोळवण करण्यात आली.
जळगाव शहरातील ममुराबाद रोडवरील प्रजापत नगरजवळ शेख जूनेद शेख मकदूम हे मंगळवार २६ ऑगस्ट रोजी रस्त्याच्याकडेला लघूशंका करीत होते. यावेळी लघुशंका अंगावर उडाल्याच्या संशयावरुन चार जणांच्या टोळक्याने शेख जूनेद याला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन गटात वाद सुरु असल्याचे समजताच एका गटातील काही लोकांच्या त्याठिकाणी जमाव जमला होता. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका व शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिसांनी प्रवीण भरत ढावळे, शुभम सोनवणे, अतुल सोनवणे याच्यासह आणखी एक अशा चार जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हयाची नोंद केली आहे. तपास सफौ सुनिल पाटील हे करीत आहे.




