पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील माळी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या एका घरात अवैधरीत्या साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आणि देशी-विदेशी दारूचा मोठा साठा पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या मदतीने ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास माळी मंगल कार्यालयाच्या मागील एका घरावर छापा टाकला. या झडतीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ‘विमल’ पानमसाला, रिकाम्या पुड्या आणि ‘टँगो पंच’ या कंपनीच्या ९० मिलीच्या ६६ दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल मिळून आला.

या प्रकरणी सिद्धांत उर्फ आणा प्रदीप निकम आणि अमित उर्फ सागर प्रदीप निकम (रा. पिंपळगाव हरे.) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिरालाल पाटील हे करीत आहे.



