भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवारातील इलेक्ट्रिक डीपीच्या जवळून १० हजार रुपये किमतीचे अल्युमिनिअमच्या तारांची चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आला. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवारातील परिसरात महावितरण कंपनीचे मालकीचे इलेक्ट्रिक डीपी लावण्यात आले आहे. या ठिकाणी डीपीच्या लघुदाब वाहिनीवर अल्युमिनियमच्या तार देखील लावण्यात आलेले आहे. २३ नोव्हेंबर सायंकाळी ४ ते २४ नोव्हेंबर सकाळी ९ वाजेच्या दरम्यान इलेक्ट्रिक डीपीजवळ ठेवलेले १० हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे घटना घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महावितरणचे अभियंता कविता सोनवणे यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश राठोड करीत आहे.