जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील गोकुळ स्वीट मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या गौसिया मशीदच्या आवारात ज्युपिटर मोटरसायकलच्या डिक्कीतून १ लाखाची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, शोएब शेख शकील (रा. गुलशनेरजा कॉलनी, पिंप्राळा) हे जना स्मॉल फायनान्स कंपनीत कामाला आहे. त्यांनी १० जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास डीएसपी चौकातील एचडीएफसी बँकेतील खात्यातून ८३ हजार रूपये काढले व त्यांच्या स्वत:कडे १७ हजार रूपये असे मिळून १ लाख रूपये होते. ही रक्कम त्यांच्या भाऊंच्या खात्यात टाकण्यासाठी त्यांना एक्विटास बँकेत जाण्याचे होते. ही रक्कम आणि वेगवेगळया खातेदारांचे चेक त्यांनी पिवळ्या रंगाच्या पिशवीत ठेवले होते. परंतू बँकेत जाण्याआधी नमाज पठणाची वेळ झाल्याने ते गोकूळ स्वीट मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या गौसिया मशीदमध्ये नमाज पठणासाठी गेले होते.
नमाज पठण झाल्यानंतर काही लोकांनी ज्युपिटर मोटरसायकल (MH19DQ5702) कोणाची आहे ? त्यांच्या डिक्कीतून कोणीतरी पैसे काढून घेऊन जात आहे. असे समजल्यावर शोएब शेख लगेच बाहेर आले व एक ३०-३५ वर्षाचा इसम त्यांची पिवळी पिशवी घेऊन जाताना दिसला व तो एका २५-३० वर्षांच्या इसमासोबत मोटरसायकलवरून पसार झाला. त्यानंतर शोएब शेख यांनी गोकुळ स्वीट मार्केटपर्यंत त्यांचा पाठलाग केला. परंतू त्यांचा कोठेही शोध लागला नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राकेश अन्नापा करत आहे.