Home Cities रावेर विवरेतील बेंडाळे हायस्कूलमध्ये गणपत गोविंदा बेंडाळे व कै. गोदावरी पाटील यांच्या प्रतिमांचे...

विवरेतील बेंडाळे हायस्कूलमध्ये गणपत गोविंदा बेंडाळे व कै. गोदावरी पाटील यांच्या प्रतिमांचे अनावरण 

0
203

विवरे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विवरे येथील श्री ग. गो. बेंडाळे हायस्कूलमध्ये आज (१५ नोव्हेंबर २०२५, शनिवार) संस्थेला जमीन, दिशा आणि बळ देणाऱ्या दोन महान व्यक्तींच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. गावाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या आणि दानशूर वृत्तीने शाळेला पाठबळ देणाऱ्या स्व. गणपत गोविंदा बेंडाळे आणि कै. गोदावरी वासुदेव पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेल्या या समारंभात मोठ्या संख्येने मान्यवर, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शाळेला जागा प्रदान करणारे, विवरे गावातील सधन आणि प्रगतशील शेतकरी स्व. गणपत गोविंदा बेंडाळे यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. तर गावाच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या कै. गोदावरी वासुदेव पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण आमदार मा. अमोल जावळे यांच्या हस्ते पार पाडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास वासुदेव पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. त्यानंतर शिक्षक नेते सहकार महर्षी एस. डी. भिरूड, बापूसो उदय पाटील व माजी अध्यक्ष यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन प्रा. शैलेश राणे यांनी प्रस्ताविक केले. शिक्षण विकास मंडळ विवरे यांच्या वाटचालीवरील स्मरणिका माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते तर शाळेच्या गौरवांकाचे प्रकाशन माजी आमदार अरुण दादा पाटील यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात देणगींची उधळणही झाली. गणपत बेंडाळे यांच्या कन्या शकुंतला बोरोले आणि सिंधू पाटील यांनी प्रत्येकी ₹५१,००० तर तिसऱ्या कन्या विमल गुळवे यांनी ₹२१,००० ची देणगी जाहीर केली. प्रगतशील शेतकरी तथा अँग्लो-उर्दू हायस्कूलचे चेअरमन शेख रफिक शेख बिस्मिल्ला यांनी ₹२१,००० तर माजी विद्यार्थी वासुदेव नरवाडे यांनी ₹५,१०० संस्थेला दिले. तसेच ₹५,००१ गुप्त देणगीही प्राप्त झाली.

यावेळी आमदार अमोल जावळे यांनी संस्थेच्या जडणघडणीत सक्रिय योगदान देण्याचे आश्वासन देत अभ्यासिका उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तर माननीय रक्षाताई खडसे यांनी शाळेसाठी क्रीडांगण व व्यायामाशी संबंधित सुविधांच्या उभारणीसाठी मदतीचे आश्वासन दिले. “देश प्रगत व्हायचा असेल तर नवीन पिढीला चांगले संस्कार व दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.

माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी स्व. मधुकरराव चौधरी यांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत भविष्यातही आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही दिली. माजी आमदार अरुण दादा पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतातून डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या आईची प्रतिमा शाळेत लावल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली.

या कार्यक्रमाला जिल्हा व तालुक्यातील असंख्य पदाधिकारी, शिक्षणक्षेत्रातील मान्यवर, संस्थांचे प्रमुख, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपशिक्षिका सौ. निलिमा नेमाडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार तेजल भिरूड यांनी मानले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शाळेतील प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound