यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल येथे उद्या केंद्र शासनाच्या ‘अग्नीपथ’ या योजनेच्या विरोधात काँग्रेस पक्ष राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.
देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकाचे व देशातील तरुणाचे भविष्य ‘अग्निपथ ‘ योजनेच्या माध्यमातून धोक्यात असल्याची भूमिका मांडत या योजनेच्या विरोधात काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात तरूणांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले असून उद्या सोमवार, दि. २७ जून रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सातोद मार्गावरील यावल तहसीलच्या नवीन प्रशासकीय ईमारतीसमोर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन होणार आहे.
या आंदोलनात पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरूणांनी या आंदोलनात मोठया संख्येत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन यावल तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, काँग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.