पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या नगरपालिकेतील थकीत मालमत्तांवरील शास्ती माफी अभय योजनेचा लाभ मिळत असतानाच, पाणीपट्टीवर आकारण्यात आलेली शास्ती देखील माफ करण्यात यावी, अशी ठाम मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा नगर परिषदेतील काही नगरसेवकांनी थेट कर निरीक्षकांकडे निवेदन देत या प्रश्नाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.
मालमत्तेवर लागू असलेल्या शास्ती माफी योजनेमुळे अनेक थकीत करदात्यांना दिलासा मिळाला असला तरी, पाणीपट्टीसारख्या जीवनावश्यक सेवांवर लावलेली शास्ती नागरिकांच्या आर्थिक क्षमतेला झटका देणारी ठरत आहे. त्यामुळेच नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, शासनाने या शास्तीमधूनही सवलत द्यावी, असा सूर उमटू लागला आहे. या मागणीला जोर देत माजी उपनगराध्यक्ष मा. दिपकभाऊ अनुष्ठान, नगरसेवक मा. पी. जी. पाटील, नगरसेवक नवल (भैय्या) चौधरी, शिवसेना शहरप्रमुख अशोकभाऊ मराठे, गौरव बडगुजर, आबा चौधरी यांनी एकत्रितपणे कर निरीक्षकांना निवेदन सादर केले.

या निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्ट केले की, शहरातील बहुतांश नागरिक मध्यमवर्गीय व श्रमिक वर्गातील असून, त्यांना वेळेवर सर्व कर भरणे शक्य नसते. पाणीपट्टी हा दर महिन्याचा नियमित खर्च असून, त्यावर शास्ती लावल्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने पाणीपट्टीवरील शास्ती देखील माफ करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
या निवेदनप्रसंगी उपरोक्त मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या मागणीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, येत्या काळात शासनाने याबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहराच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मालमत्तेसह पाणीपट्टीवरील शास्ती माफ करण्यात यावी, यासाठी स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा मुद्दा अधिक गंभीरतेने प्रशासनापर्यंत पोहोचला आहे. नागरिकांनीही याबाबतचा आग्रह कायम ठेवल्यास शासनाला या विषयाकडे लक्ष द्यावेच लागेल, अशी प्रतिक्रिया शहरात उमटत आहे.



