जळगाव प्रतिनिधी | ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आगामी जिल्हा परिषद, महानगर पालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेवू नये या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, “मा.सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील २७% आरक्षण स्थगित करण्याबाबत दिलेल्या निर्णयामुळे केवळ महाराष्ट्र राज्यातच नाही तर देशभरातील ओबीसी राजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आलेले आहे. केंद्र सरकारने इंपिरिकल डेटा देण्यास नकार दिल्याने सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने हा डेटा गोळा करावयाचा असून त्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. परंतु याच कालावधीत राज्यातील जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगर पालिकेच्या निवडणूका होणार आहे. या निवडणूका आरक्षण पूर्वरत होण्याच्या अगोदर घेतल्या गेल्या तर राज्यभरातील ओबीसींच्या हक्कावर यामुळे गदा येणार आहे.त्यामुळे ओबीसी समाजात रोष पसरलेला आहे.
ओबीसी समाजाला याचा फटका बसू नये यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मंत्री छगन भुजबळ व खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिम कोर्टात दाद मागितली. त्यात समता परिषदेच्या वतीने डीमकेचे खासदार आणि पी विल्सन यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. अनेक गावांच्या भेटी घेतल्या. ओबीसी आरक्षणासाठी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा हा राज्यातील नाहीतर देशातील सर्व ओबीसींना बसणार आहे. असे म्हणत त्यांनी कोर्टात आम्ही सर्व निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी केली.
“काही तांत्रिक बाबींमुळे ५४% असलेल्या ओबीसी वर्गाचे आरक्षण स्थगित करुन संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे आहे. ओबीसी समाजाशिवाय निवडणूका नको अशीच आमची भुमिका आहे. ‘नो रिजर्वेशन नो इलेक्शन’ ही भूमिका समता परिषदेने घेतली आहे. तसेच केंद्र सरकारने मा.सर्वोच्च न्यायालयात इंपिरिकल डेटा देण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने ओबीसी समाजाचे हक्क डावलण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेचा आम्ही तिव्र निषेध करत असून जोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणूका घेण्यात येवू नये” अशी विनंती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, गिरजाबाई बेलकर, मुकूंद मेटकर, किशोर सूर्यवंशी, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, महिला जिल्हाध्यक्ष निवेदीता ताठे, संतोष माळी, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, सुरेंद्र महाजन, पूनम खैरनार, आरती शिंपी, भारती कुमावत, वैशाली बोरसे, गजानन महाजन, अमोल कोल्हे यांच्यासह आदी उपस्थित होते.
फेसबुक व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2730823687219839