जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद येथील रेशनधारकांच्या समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी नशिराबाद ते जळगाव तहसील कार्यालयावर दांडी यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले आहे. नशिराबादकरांसाठी शिबीर आयोजित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नशिराबाद शहरात रेशन कार्डधारकांना अनेक दिवसांपासून समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शहरात असलेल्या स्वस्त धान्य दुकानावर बऱ्याच लोकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी आता वाढत आहे. नशिराबाद शहर शहरात जवळपास ५०० कुटुंबांना १२ अंकी क्रमांक मिळाला. परंतु धान्य मिळत नाही तर शहरात असलेल्या अडीच हजार कुटुंब आहेत ज्यांना रेशनकार्ड आहे. परंतु १२ आकडी क्रमांक मिळाला नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही. त्याचप्रमाणे रेशनकार्डधारकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे वाढवणे किंवा कमी करणे, यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दरम्यान शासनाने प्रत्येक कुटुंबाला कोरोना काळात मोफत धान्य दिल्याचे जाहीर केले आहे. मात्र नशिराबाद येथील काही लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत त्याचा फायदा झालेला नाही. या संदर्भात एक वर्षांपूर्वी देखील या समस्यांचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले होते. यावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. नशिराबादकरांसाठी शिबीर आयोजित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन, बरकत अली युसूफ अली, विनोद रंधे, निलेश रोटे,चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती.