पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे खानदेश दौऱ्यावर आले असता त्यांना नंदुरबार येथे असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भिका चौधरी यांनी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिले.
यात खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
1. जेष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान योजनेत स्व.शंकरराव चव्हाण कल्याण निधीत येणाऱ्या आर्थिक वर्षात शंभर कोटीची रक्कम या योजनेसाठी टाकून सन्मान योजनेत पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा.
2. राज्यातील नगर परिषदा व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महानगरपालिकांच्या जाहिराती शासनमान्य साप्ताहीकांना मिळत नाही. त्या जाहिराती नगरविकास विभागाने स्वतंत्र परिपत्रक काढून शासनमान्य जाहिरात यादिवरील साप्ताहिकांना जाहिराती देण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात यावेत.
3. जेष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान योजनेत अनेकांना 60 वर्ष व इतर निकष पूर्ण करूनही मानधन मिळत नाही अशा सर्व जेष्ठ पत्रकारांना या योजनेत सामावून घेवून त्यांना त्वरित मानधन सुरू करण्यात यावे.
4. राज्य शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या विविध अशासकीय समितीत अधिस्वीकृती धारक पत्रकारांना प्राधान्य देण्यात यावे.
आदी मागण्यांचे निवेदन असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भिका चौधरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अमळनेरचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी, नंदुरबारच्या खा.डॉ.हिना गावित, भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, भाजपचे किशोर काळकर आदी उपस्थित होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करून पत्रकारांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले.