अमळनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत गेल्याने कोविड केयर सेंटर पाठोपाठ कोविड हेल्थ सेंटर देखील बंद करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कार्यमुक्त केल्याने उपासमारीची वेळ आली असल्यामुळे कोविड सेंटर पुन्हा सुरू करावे किंवा रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांना समाविष्ट करावे अशी मागणी माजी आ.स्मिता वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानतंर सर्वप्रथम जिल्ह्यात जळगावनंतर अमळनेर येथे प्रताप महाविद्यालयात कोविड केयर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले होते. काही दिवसांपासून रुग्ण संख्या कमी झाल्याने केयर सेंटर बंद करण्यात आले होते. तसेच रुग्ण कमी असूनही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर खर्च होत होता. म्हणून जिल्हाधिकारींनी जिल्ह्यातील कोविड हेल्थ सेंटर बंद करून फक्त जिल्हा रुग्णालय, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर येथील उपजिल्हारुग्णालये आणि फक्त चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालय कोरोनाच्या रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अमळनेर येथील कोविड हेल्थ सेंटर च्या कर्मचाऱ्यांना ही खंड देण्यात आला असून रुग्ण वाढल्यास पुन्हा सेवेत घेण्याचे पत्रात म्हटले आहे.
मात्र अमळनेर येथे चाळीसगाव पेक्षा अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने कोविड सेंटर परत सुरू करावे किंवा रिक्त पदावर समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी डॉ. वर्षा पाटील, योगेश चव्हाण, निखत सैय्यद, माधवी गायकवाड, प्रगती वानखेडे, राजश्री पाटील, रोशनी गवई, दीपक धनगर, चित्रा बडगुजर, वैशाली चव्हाण, सचिन पाटील यांनी माजी आमदार स्मिता वाघ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.