यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल येथील पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी लिपिक संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या लिपिक संवर्गावर सर्व विभागांच्या आस्थापनेची जबाबदारी असते. मात्र चौथ्या वेतन आयोगापासून लिपिकांच्या वेतनश्रेणीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. पूर्वी शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अनुरेखक आदी संवर्गाचे वेतन लिपिकांच्या समकक्ष किंवा कमी होते. मात्र त्यानंतर इतर संवर्गांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून लिपिक संवर्ग मात्र मागे पडला आहे.

त्यामुळे लिपिक संवर्गावरील अन्याय दूर करून त्यांना सुधारीत वेतनश्रेणी लागू करावी, पदोन्नतीची साखळी कमी करावी तसेच पदनामात बदल करून नवीन पदनाम देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावर प्रतीक्षा यादीत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, तसेच गोदावरी महामंडळ स्वायत्त करताना वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे कोषागार कार्यालयामार्फत करण्यात यावे, अशा मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या मागण्यांसाठी राज्यभर सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



