
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मानार्थ निवृत्ती निधी व इतर सुविधांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले. रविवार, १७ ऑगस्ट रोजी अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा होता, त्यावेळी पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

जळगाव दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक कार्यालयात भेट घेण्यात आली. या शिष्टमंडळात जिल्हा पत्रकार संघाचे कार्यवाह अशोकआप्पा भाटीया, जिल्हाध्यक्ष प्रमोदअण्णा पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भिका चौधरी व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील सहभागी होते. त्यांनी पत्रकारांसाठी सन्मान निधीच्या नियमांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या किचकट अटी शिथिल करण्याची मागणी केली. विशेषतः, २५ वर्षांहून अधिक सेवा दिलेल्या ज्येष्ठ पत्रकारांसाठी सलग सेवेची अट रद्द करण्यात यावी, वयस्कर व व्याधीग्रस्त पत्रकारांसाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली.
तसेच, निवृत्त पत्रकाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला दरमहा ठराविक रक्कम देण्याची तरतूद करावी, किमान निवृत्ती सन्मान निधीची रक्कम वाढवावी आणि विद्यमान योजना अधिक सुलभ व व्यवहार्य करावी अशा मुद्द्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला. या मागण्या करताना पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला.
या निवेदनावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांच्या भूमिका आणि योगदानाची दखल घेत, त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले. पत्रकारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे संकेत देत त्यांनी यासाठी आवश्यक त्या धोरणात्मक निर्णयांचा विचार केला जाईल असेही सांगितले.
या भेटीवेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी आमदार मनिष जैन, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवानेते योगेश देसले व इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.



