
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आदिवासी भील समाजाच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी समाज बांधवांनी आज सोमवार, २८ जुलै रोजी दुपारी १ वाजता धरणगाव तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनात समाजाला भेडसावणाऱ्या अनेक मूलभूत समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, धरणगाव तालुक्यातील जांभोरा, धानोरा, बोरगाव, हिंगोली, निसाणे, चामखेडा या भागातील आदिवासी भील समाज बांधवांना अनेक वर्षांपासून विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या अद्यापही प्रलंबित असून, त्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
यातील मुख्य मागण्यांमध्ये आदिवासी बांधवांसाठी घरकुल उपलब्ध करून देणे, समाजाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी समाज मंदिर बांधून देणे आणि अतिक्रमित बांधलेली घरे नियमित करणे यांचा समावेश आहे. अनेक आदिवासी बांधव अजूनही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असून, त्यांना स्वतःच्या हक्काचे घर नाही. तसेच, समाजासाठी एकत्र येऊन कार्यक्रम घेण्याकरिता योग्य जागा किंवा मंदिर नसल्याने अडचणी येत आहेत. अतिक्रमित घरांच्या नियमितीकरणाचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने त्यांना सुरक्षित निवाऱ्याची हमी मिळत नाहीये.
या मागण्या मान्य करून प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आदिवासी भील समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. तहसीलदारांना सादर केलेल्या या निवेदनामुळे प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्यांकडे वेधले गेले असून, यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा समाज बांधवांना आहे.



