अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय इतिहासातील महान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा अपमान होण्याच्या विरोधात अमळनेर येथील विविध धर्म, जाती, पंथ आणि वर्णातील नागरिकांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासह प्रांताधिकारी अमळनेर यांना एक जाहिर निवेदन पाठवले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी आपल्या दुखावलेल्या भावना व्यक्त केल्या असून, वाराणशीतील मनकर्णीका घाट आणि अन्य धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण, तसेच इतिहासाचे अवमूल्यन करण्याच्या प्रयत्नांविरोधात निषेध नोंदविला आहे.

सदर निवेदनात नागरिकांनी नमूद केले आहे की, भारतात विविधतेने नटलेल्या समाजात एकात्मता राखणे ही प्रामुख्याने नेतृत्वाची जबाबदारी आहे, मात्र सध्या काही धोरणात्मक निर्णयांमुळे सामान्य जनता वेदना अनुभवत आहे. त्यांनी म्हटले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त देशभर समाजाने त्यांचा गौरव केला, मात्र वाराणशी येथे काही अतिक्रमक उपाययोजनांमुळे त्यांचे स्मरणस्थान धोक्यात आले आहे.

नागरिकांच्या मते, अहिल्यादेवींच्या आयुष्यातील अनेक संकटांना तोंड देऊन त्यांनी रस्ते, विहिरी, कालवे, धरणे आणि धार्मिक शाळा निर्माण केली, ज्यामुळे तत्कालीन समाजाला मोठा दिलासा मिळाला. मात्र, आजकालच्या यांत्रिक राक्षसांचा वापर करून त्यांच्या कार्याचे जतन न करता, त्यांचे स्मरणस्थान उध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. हे वर्तन इतिहासाच्या सुवर्णपानांचा अपमान असल्याचे नागरिकांचे मत आहे.
निवेदनात विविध धर्म, जाती, पंथाचे नागरिकांनी आपली एकमत स्पष्ट करत निषेध व्यक्त केला आहे आणि पंतप्रधानांना तसेच प्रांताधिकारी अमळनेर यांना विनंती केली आहे की, राजमाता अहिल्यादेवींच्या स्मृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यात तत्परता दाखवावी. नागरिकांनी हे निवेदन स्वाक्षरीसह पाठवून देशातील सर्व महापुरुषांच्या स्मृतीस होणाऱ्या धोके टाळण्याचे आवाहन केले आहे.



