पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथे अखिल भारतीय बारी समाज महासंघातर्फे नायब तहसीलदार अनिल पाटील यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथे मंजूर करण्यात आलेल्या संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक व संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यवाहीत गतिमानता यावी, तसेच सामाजिक उन्नतीस चालना मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी समाज बांधवांनी एकत्र येत प्रशासनाकडे ठोस कृतीची मागणी केली.
सदर स्मारक आणि महामंडळ हे बारी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचे असून यामुळे समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आवश्यक ती गती अद्याप आलेली नाही. विशेषतः आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची नेमणूक प्रलंबित असून, कामकाज सुरू होण्याची प्रतीक्षा समाजबांधव करत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला वेग द्यावा आणि महामंडळ तत्काळ कार्यरत करावे, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच, संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन येत्या दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, अशीही अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली आहे. समाजाच्या भावना लक्षात घेता प्रशासनाने लवकरच या प्रकल्पांच्या अंमलबजावणीस सुरुवात करावी, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनप्रसंगी अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे अध्यक्ष मोतीलाल सुका बारी, उपाध्यक्ष गणेश चुनिलाल बारी, सचिव परेश देविदास सौपुरे यांच्यासह रतन किसनराव फुसे, राजू वामन बारी, माजी नगरसेवक सुरेश प्रकाश बारी, ज्ञानेश्वर दगडू बारी, दत्तात्रय रामभाऊ बारी, सुनील वसंत बारी, महेंद्र छगन बारी, ज्ञानेश्वर त्र्यंबक बारी, शरद खंडू बारी, अशोक श्यामराव बारी, जितेंद्र अशोक बारी, अनिल धोंडू बारी, जितेंद्र दिनकर बारी, कृष्णा सोमा बारी, ईश्वर हिरामण बारी, निलेश आत्माराम बारी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या एकजुटीमुळे समाजाच्या न्याय्य मागण्यांना प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



