सांगवी येथील शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी निवेदन

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसह विविध मागण्यांबाबत येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदन दिले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे होऊन शासकीय मदतीपासून शेतकरी अद्याप वंचित आहेत. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे गुरूवार रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहेत. सदर निवेदनात ३० ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान पंचणामे होऊन महिना उलटला परंतु अद्यापपर्यंत शासकीय मदत जाहीर न झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर दुसरीकडे  शासनाने ई-पिकपेरा मोबाईलच्या साहाय्याने लावण्याचे निर्देश दिलेले आहेत.

मात्र सांगवी येथे बहूतेक शेतकरी हे अडाणी असून त्यांच्याजवळ मोबाईल नसल्याकारणाने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे ई-पिकपेरा लावणे बाकी आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मिळणारे दोन हजार रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही. म्हणून जगावं कसं असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. तर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे घरे, भिंत, गुरेढोरे यांचा गोठा पडला आहे. परंतु अध्यापावेतो पंचनामे झालेला नाही. अशा विविध समस्यांना ग्रासलेले शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याप्रसंगी सरपंच महेंद्रसिंग राठोड, सदस्य सचिन ठाकरे, पोलिस पाटील ज्ञानेश्वर जाधव व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Protected Content