अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिमाखात साजरी केली जाणार आहे. या पवित्र दिवशी संपूर्ण तालुक्यातील शिवप्रेमी दर्शनासाठी व कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने नगरपरिषदेला नाट्यमंदिर सजावट व विद्युत रोषणाईसाठी निवेदन दिले आहे.
निवेदनामध्ये नगरपरिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्याकडे शहरातील सर्व परिसर स्वच्छ व आकर्षक ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच नाट्यमंदिराची आकर्षक सजावट, संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई, कार्यरत पथदिवे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची पॉलिशिंग करून उत्सवाची शोभा वाढवण्याची मागणी केली आहे.

समितीच्या म्हणण्यानुसार, यामुळे केवळ शहराचा सौंदर्य आणि लौकिक वाढणार नाही, तर शिवजयंती उत्सव अधिक दिमाखात, सुव्यवस्थित आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करता येईल. नगरपरिषद प्रशासनाने याबाबत तत्परता दाखवून सकारात्मक कार्यवाही करावी, अशी समितीने अपेक्षा व्यक्त केली आहे.



