
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 पार पडून अवघे काही दिवस झाले असतानाच फैजपूर नगरपरिषदेकडून निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावतीबाबत मोठा मुद्दा समोर आला आहे. निवडणुकीचे कामकाज प्रामाणिकपणे पूर्ण करणाऱ्या केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि शिपायांना इतर नगरपालिकांच्या तुलनेत कमी मानधन मिळाल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत न्याय मिळावा, तफावत दूर करावी या मागणीसाठी ‘एनमुक्तो’ प्राध्यापक संघटनेतर्फे फैजपूर नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले.

२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना दिलेल्या मानधनात फैजपूर नगरपरिषद इतर ठिकाणांपेक्षा मागे असल्याचे उघड झाले आहे. यावल नगरपालिकेत केंद्राध्यक्ष ३,००० रुपये, मतदान अधिकारी २,६०० रुपये आणि शिपाई १,७०० रुपये इतके मानधन दिले असताना फैजपूरमध्ये प्रत्येकी तब्बल १,००० रुपये कमी मानधन देण्यात आले. एकाच जिल्ह्यात, एकाच तालुक्यात आणि एकाच स्वरूपाच्या कामासाठी एवढी मोठी तफावत का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये उपस्थित झाला आहे. कमी मानधनामुळे त्यांच्यात अन्यायाची भावना बळावल्याने ‘एनमुक्तो’चे केंद्रीय सहसचिव डॉ. विजय सोनजे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नावे मुख्याधिकारी श्री. अविनाश गांगोडे यांना लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात कर्मचाऱ्यांना उर्वरित रक्कम तातडीने देण्यात यावी, मानधनाचे दर राज्यभरातील समान निकषांनुसार करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर डॉ. विजय सोनजे यांच्यासह डॉ. ताराचंद सावसाकडे, डॉ. रवी केसूर, डॉ. मच्छिंद्र पाटील, डॉ. सतीश पाटील, डॉ. जगदीश खरात, डॉ. योगेश तायडे, डॉ. अचल भोगे तसेच इतर सदस्यांच्या सह्यांचा समावेश आहे.
निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली. निवडणूक अधिकारी आणि कार्यालयीन पातळीवर तातडीने चर्चा करून आठ दिवसांच्या आत योग्य, सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसेच कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी कशी आणि कितपत लवकर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



