फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. नगरपरिषदांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या विशेष अनुदान योजनेतून फैजपूर नगरपरिषदेसाठी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या महत्त्वपूर्ण निधीतून शहरात अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त अशी नवी अभ्यासिका उभारली जाणार आहे.
फैजपूर शहरात उच्च दर्जाची व शांत वातावरणातील अभ्यासिकेची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणादायी आणि सुसज्ज वातावरण मिळावे, या उद्देशाने स्थानिक आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून, शासनाने अखेर हा मोठा निधी मंजूर केला आहे.

आ. अमोल जावळे यांचा शिक्षण क्षेत्राशी विशेष जिव्हाळा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या याच भूमिकेतून ही ५२ लाखांची तरतूद झाली आहे. या नव्याने उभारल्या जाणाऱ्या अभ्यासिकेमुळे फैजपूर शहरासह परिसरातील विद्यार्थ्यांना शांत व योग्य सुविधांसह अभ्यास करण्याची सोय मिळणार आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा आधार मिळेल.
निधी मंजुरीची बातमी शहरात पसरताच नागरिक आणि विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या या विधायक प्रयत्नांबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. ही अभ्यासिका लवकरच अत्याधुनिक सुविधांसह एक महत्त्वपूर्ण ‘ज्ञानकेंद्र’ म्हणून कार्यरत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.



