मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दीर्घ काळाने आज मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार असून यात नेमकी कुणाला संधी मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी ११ वाजता राजभवन येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी काल सायंकाळ पासूनच जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे नावे जवळपास निश्चीत करण्यात आली आहेत.
आज होणार्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, भरत गोगावले, शंभूराज देसाई आदींना मंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या सर्वांचे समर्थक आज पहाटेच मुंबईत दाखल झाल्याचे दिसून येत आहे. तर ऐन वेळेस अजून एखाद-दुसरे नाव समोर येण्याची शक्यता आहे.
यासोबत भारतीय जनता पक्षाकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनंगटीवार, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण तसेच माधुरी मिसाळ आदींची नावे निश्चित झाली आहेत. यात अजून काही नवीन नावांचा समावेश होण्याची देखील शक्यता आहे. तर, मंत्रीमंडळ विस्ताराआधी आज सकाळी साडेनऊ वाजता शिंदे आणि फडणवीस यांची महत्वाची बैठक होणार आहे.