मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे अपंग जनता दल सामाजिक संघटनेची राज्यस्तरीय बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून या बैठकीत संघटन विस्तार, दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा आणि नव्या कार्यकारिणीची घोषणा यावर विशेष भर देण्यात आला.
दिनांक २५ मार्च २०२६ रोजी मुक्ताई पॅलेस येथे आयोजित या बैठकीला राज्यभरातील दिव्यांग बांधव आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग नेते अनिस शेख यांनी भूषविले. महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

बैठकीदरम्यान संस्थापक अध्यक्ष अनिस शेख तसेच राज्य अध्यक्ष जाकीर शेख यांनी संघटनेच्या उद्दिष्टांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारण्याची गरज अधोरेखित करत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. तसेच सामाजिक न्याय आणि समान संधी यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब दसपुते, राज्य संपर्क प्रमुख लक्ष्मण, राज्य उपाध्यक्ष कुणाल झाल्टे, गणेश मगर, जालना जिल्हाध्यक्ष नूर चौधरी, वाघे, राज्य महिला अध्यक्षा मीनाताई धोत्रे तसेच महिला उपाध्यक्ष सरला लुले यांनीही आपले विचार मांडले. विविध पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढीसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची आवश्यकता व्यक्त केली.
या बैठकीत संघटनेत सक्रिय असलेल्या तसेच नव्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. संघटन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून सीताराम काकासाहेब, जळगाव उपाध्यक्ष म्हणून गणेश भोबे, यावल तालुकाध्यक्ष म्हणून ऐसान शेख, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष म्हणून मुजीब शाह, तालुका उपाध्यक्ष म्हणून अमोल चोपडे तसेच विजय पवार (रावेर) यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनार यांनी केले होते. बैठकीचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरळीत पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.



