
पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील करंजी बु. हे गाव आपल्या सर्वांगीण विकासकामांसाठी राज्यस्तरावर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. राज्य पुरस्कृत घरकुल आवास योजनेचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल करंजी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच भैय्यासाहेब रोकडे व ग्रामपंचायत अधिकारी सौ. वैशाली पाटील यांना नुकतेच राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषद सीईओ मीनल करणवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

करंजी बु. गावाने केवळ घरकुल योजनेत नव्हे तर पर्यावरणपूरक उपक्रमांमध्येही आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. सरपंच भैय्यासाहेब रोकडे यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांपासून गावात नियमितपणे वृक्षारोपण मोहीम राबवली जाते. विशेष म्हणजे, लावलेल्या झाडांचे संगोपन, संरक्षण आणि देखभाल याकडे विशेष लक्ष दिले जाते. यावर्षी महादेव मंदिर परिसर व स्मशानभूमीत वड, पिंपळ आणि विविध फळझाडांची लागवड करण्यात आली असून, जनावरांपासून झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी कुंपणासाठी लोखंडी जाळ्याही बसवण्यात आल्या आहेत.
सरपंच रोकडे यांच्या नेतृत्वाखाली करंजी बु. हे गाव शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांच्या कार्यकाळात गावातील गरजू घटस्फोटित, विधवा व वयोवृद्ध महिलांना संजय गांधी निराधार योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. घरकुल योजनेत १६६ लाभार्थ्यांना, शेवगा लागवडीत २२ शेतकऱ्यांना, सागवान लागवडीत ५ लाभार्थ्यांना, तर गोठा शेडसाठी ७ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाली आहे.
याशिवाय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणारे हे गाव ठरले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक शासकीय लाभ उपलब्ध झाले आहेत. ‘गावाचा विकास हाच माझा ध्यास’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून सरपंच रोकडे यांनी नेतृत्व केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना लोकमत लोकनायक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.



