भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मस्तकात पुस्तक गेले पाहिजे आणि पुस्तक मस्तकात गेल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही. शिक्षण हे महत्वाच्यास्थानी येवून बसले आहे. मुलगा असो की मुलगी शिक्षणामध्ये अग्रेसर असले पाहिजे. आज आपण बघतो की, शेतकर्यांच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही, अशी स्थिती आहे, असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र परिट सेवा मंडळ जळगाव व श्री संत गाडगे महाराज परिट सेवा संस्था, भुसावळ यांचा वतीने आज २६ रोजी सभागृह लोकार्पण सोहळा व वधू-वर परिचय मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे ना. गुलाबराव पाटील, आ. संजय सावकारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी समाजातील पदाधिकार्यांनी मान्यवरांचा सन्मान केला. तसेच समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा ना. पाटील व आ. सावकारे यांच्यासह मान्यवरांनी सन्मान केला. कार्यक्रमाचे अध्यक्षानी आ.संजय सावकारे होते.
कार्यक्रमास उत्तर प्रदेश लखनऊ येथील पीठाधीश्वर प. पू. अशोक महाराज, पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, अ.भा. समाज राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे, व उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, महाराष्ट्र परिट सेवा मंडळ माजी प्रदेशाध्यक्ष विजयराव देसाई व प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, ज्येष्ठ मार्गदर्शक किसनराव जोर्वेकर, अ.भा. महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार मालविय, पुणे येथील माजी उपमहापौर सुरेशराव नाशिककर, संत गाडगेबाबा स्मारक बांधकाम समिती प्रदेशाध्यक्ष दिलीपराव शिंदे, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती किशोर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र परिट सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष वैâलास शेलोडे यांनी प्रास्ताविक केले. पुढे बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आज संविधानदिनी सुंदर कार्यक्रम होत आहे.
समाजामध्ये स्वच्छता करण्याकरीता हा मेळावा आहे व राज्यामध्येही स्वच्छता व्हावी याकरीता मी मंत्री आहे. वधू-वर परिचय मेळावा काळाची गरज असून आता मुलींना हुंडा द्यावा लागत आहे. सध्या गडचिरोलीला जावे लागते लग्न जुळवायला. गडचिरोली, भंडारा, गोंदीया येथील मुली मुलावाल्यांना पसंत करतात. आता काळानुसार गोष्टी बदलत असतात. बीबीसीच्या बातम्या एकणारे आता मोबाईलवरच पिक्चर बघायला लागले, असेही ते म्हणाले. मुलींचे प्रमाण कमी असून राज्य जळगाव जिल्ह्याची स्थिती मी पाहिली असता १ हजार मुलांच्यामागे ८५९ मुली आहेत. १४१ मुले साधू होतील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुलीच्या आईचा आग्रह असतो की मुलगा नोकरीवालाच पाहिजे. मात्र धंदेवाला चार लोकांचे पोट भरतो त्यामुळे त्याच्या सोबत मुलीचे लग्न लावून दिले पाहिजे. परीट समाजामध्ये मुलीचे प्रमाण उत्तम आहे. वधू- वरांची उपस्थिती नसल्याची खंत आहे. ते पुढे म्हणाले की प्रत्येक समाजाने उठावे आणि आरक्षण मागावे. कदाचित आम्हालाही भिती वाटते की देशाच काय होणार आहे. पोटाला जात, धर्म नसते, पंथ माहित नसते. लोकप्रतिनिधी होत असतांना आम्हीसुद्धा छोट्या समाजामध्ये जन्माला आलो. काम करणार्याला समाज काही आडवा येत नसून निवडून येण्याकरीता इतर समाजाचे पाचपट आशिर्वाद लागतात. संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहिर करावी, अशी मागणी समाजाने केली. मी आपला पोस्टमन आहे. निश्चितच मी आपले पत्र घेवून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणारा पहिला मंत्री असेल. मदत करण्याचे वचन मी देतो. पुढच्या मेळाव्यात दोनशे मुला-मुलींनी परिचय दिला पाहिजे, ही शपथ घेण्याची गरज आहे. परिट धोबी समाज एकटा नाही. आम्हीसुद्धा खांद्याला खांदा लावून १०० टक्के उभे राहणारे कार्यकर्ते आहोत, असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
यावेळी आ. संजय सावकारे म्हणाले की, वधू-वर मेळावा घेतला म्हणजे समस्या संपल्या असे होत नाही. समाजाच्या समस्या काय आहेत. त्यावर उपाय काय आहेत. ते उपाय करण्याकरीता काय केले पाहिजे. सगळे पदाधिकारी एकत्र येवून मंथन केले पाहिजे. जरी वेगवेगळ्या पक्षात काम करीत असले तरी सर्वांनी एकत्र येवून समाजाच्या समस्या सोडविल्या पाहिजे. आपले पक्षाचे विचार वेगवेगळे असू शकतात. परंतु समाजाकरीता एक विचार असला पाहिजे. छोटा समाज असला तरी समाजाची ताकद दाखविली पाहिजे. तरच तुमची किंमत होते. असे कार्यक्रम राज्याच्या विविध भागामध्ये झालेच पाहिजे. तर कळेल हा समाज मोठा आहे. समाजाची संख्या मोठी आहे. ती फक्त विखूरली गेली आहे. समाजाची संख्या ३० लाख आहे. ती कमी समजू नका आणि स्वतःलाही कमी लेखू नका, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समाजाचे पदाधिकार्यांनी केले. आभार परिट समाज संस्थाध्यक्ष रमेश ठाकरे यांनी केले. यावेळी राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.