मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पालकांचा सध्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे वाढता कल पाहून आता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यास पॅटर्न राबवला जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. या निर्णयाच्या अंतर्गत तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित झाला आला आहे. तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकवला जाणार आहे.
सध्या राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधून शिकणारे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात असे समोर आले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे बदल करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही विचार होणार आहे.
राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमधील प्रवेशांचे प्रमाण कमी झाले आहे. ते वाढवण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेतले जात आहेत. सीबीएसई शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या राज्य सरकारच्या वेळापत्रक आणि सुट्ट्यांपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे आता सीबीएसई शाळाप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांची चर्चा करण्यात येणार असल्याचे केसरकर म्हणाले आहेत.