Home प्रशासन जिल्हा परिषद शेतपाणंद रस्ते व पंचायत समिती कामे तातडीने सुरू करा; आमदार अमोल पाटील...

शेतपाणंद रस्ते व पंचायत समिती कामे तातडीने सुरू करा; आमदार अमोल पाटील यांचे कडक निर्देश


पारोळा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा आणि एरंडोल तालुक्यात मंजूर झालेल्या शेतपाणंद रस्त्यांसह कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना गती देण्यासाठी आमदार अमोल पाटील यांनी अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले आहेत. रखडलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.

पारोळा व एरंडोल तालुक्यातील विविध विकासकामांना माजी आमदार चिमणराव पाटील व आमदार अमोल पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली आहे. मात्र काही ठिकाणी प्रशासकीय अडचणी, तांत्रिक कारणे तसेच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतपाणंद रस्त्यांची कामे थांबलेली असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चा करण्यात आली.

ही बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवालयांच्या उपस्थितीत पार पडली. पूर्वी मस्टर सुरू असलेल्या शेतपाणंद रस्त्यांची कामे येत्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा सुरू करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. सिस्टममध्ये ‘डिलीट’ झालेली किंवा मंजूर होऊनही प्रत्यक्षात सुरू न झालेली कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन घेण्याचे ठरवण्यात आले.

घरकुल योजना, गोठा शेड बांधकाम तसेच प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. नव्या प्रस्तावांना लवकर मंजुरी देऊन ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असे निर्देश आमदारांनी दिले.

कामात कोणताही हलगर्जीपणा, जनतेची दिशाभूल किंवा अनावश्यक विलंब आढळल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आमदार अमोल पाटील यांनी दिला. विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीस सिंचन विभागाचे अभियंता अमोल पाटील, पारोळा तहसीलचे तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता खरात, पारोळा गटविकास अधिकारी संजय मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound