मुंबई / जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील अनेक गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास चक्रीवादळासह मुसळधार पावसाने तडाखा दिला असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून शासकीय पातळीवर तात्काळ मदत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या असून ते सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तहसीलदार अरूण शेवाळे हे आपल्या सहकार्यांसह आज पहाटेपासूनच आपत्तीग्रस्त गावांना भेटी देत असून त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा, तोंडापूर व ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तालुक्यातील ओझर गावामध्ये सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली. भागदरा या गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले. तर अनेक शेतातील कपाशी वाहून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे दोघा गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने ओझर, तळेगाव, टाकळी आणि तोंडापूर या गावांमध्ये तुलनेत जास्त हानी झाली आहे.
आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे मुंबईत असून त्यांनी या आपत्तीची माहिती मिळताच तात्काळ जिल्हाधिकारी आणि जामनेरच्या तहसीलदारांशी संपर्क साधून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुक्यात आवश्यकता पडल्यास एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. पालकमंत्री प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, तहसीलदार अरूण शेवाळे हे आपल्या सहकार्यांसह आज पहाटेपासूनच आपत्तीग्रस्त गावांना भेटी देत असून त्यांनी मदतकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.