Home प्रशासन नगरपालिका भुसावळ नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत स्थायी समितीची स्थापना; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सभात्याग

भुसावळ नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत स्थायी समितीची स्थापना; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सभात्याग


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेची पहिली सभा आज जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आली. या सभेत स्थायी समितीचे गठन करण्यात आले आणि विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड निश्चित करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, गटनेते सचिन चौधरी आणि त्यांच्या गटातील बहुतांश नगरसेवकांनी सभेत अर्धवट उपस्थित राहून सभात्याग केला, ज्यामुळे सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले.

नगरपरिषदेची एकूण संख्या ५१ असून, तीन नोंदणीकृत गट कार्यरत आहेत – भाजप (गटनेते युवराज लोणारी), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (गटनेते सचिन चौधरी), आणि शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्षांचा तिसरा गट (गटनेते बबलू बऱ्हाटे). सभेचे सूत्रसंचालन मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी केले. व्यासपीठावर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपाध्यक्षा शैलेजा नारखेडे, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील आणि उपमुख्याधिकारी परवेझ अहमद उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे गटनेते सचिन चौधरी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सभा बरखास्त करण्याचा निवेदन दिले. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट आदेश असल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी सभा नियमानुसार सुरु राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी गटाकडून काही नगरसेवकांनी सभा अवैध असल्याचा दावा केला, मात्र भाजपने सभा कायद्याच्या चौकटीत असल्याचे स्पष्ट केले.

विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची निवड सभात्यागानंतर उर्वरित उपस्थित सदस्यांद्वारे निश्चित करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापतीपदी उपाध्यक्षा शैलेजा नारखेडे यांची निवड झाली. विषय समित्यांच्या सभापती म्हणून सार्वजनिक बांधकाम समिती – अनिता सतीश सपकाळे, स्वच्छता व आरोग्य – मेघा देवेंद्र वाणी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण – महिमा अजय नागराणी, महिला व बाल कल्याण – शोभा रणधीर इंगळे, नियोजन व विकास – शैलेजा नारखेडे, शिक्षण समिती – राजेंद्र आवटे असे पदाधिकारी निश्चित झाले. स्थायी समिती सदस्यांमध्ये गायत्री भंगाळे (सभापती), किरण भागवत कोलते, गिरीश महाजन, सचिन संतोष चौधरी यांचा समावेश आहे.

सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक आणि बबलू बऱ्हाटे गटाचे सदस्य उपस्थित होते, तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील बहुसंख्य नगरसेवक सभात्याग करून अनुपस्थित राहिले. यामुळे नगरपरिषदेतील राजकीय तणाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तरी स्थायी समिती व विषय समित्यांचे गठन झाल्याने प्रशासनाच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound