Home प्रशासन तहसील एस.टी. आरक्षणात बंजारा समाजाच्या समावेशास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध 

एस.टी. आरक्षणात बंजारा समाजाच्या समावेशास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध 

0
177

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बंजारा समाजाच्या एस.टी. (अनुसूचित जमाती) आरक्षणात समाविष्ट होण्याच्या हालचालींना विरोध करत आदिवासी समाजातील नेते व संघटनांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. हैद्राबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या शिफारशींविरोधात, ‘एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य’च्या नेतृत्वाखाली धरणगाव तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयामध्ये मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात येत असल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. मात्र या निर्णयाचा आधार घेत, बंजारा समाजाने एस.टी. आरक्षणाची मागणी करत ती सार्वजनिक माध्यमातून मांडली. त्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे, महिला जिल्हाध्यक्षा चंद्रकला मोरे, व इतर पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, बंजारा समाजाच्या एस.टी. आरक्षणाच्या मागणीला समर्थन देणारे आमदार आणि खासदारांचा जाहीर निषेध केला जात आहे. यामध्ये आमदार मंगेश चव्हाण (चाळीसगाव), मनोज कायंदे (सिंदखेडा राजा), हिकमत उधाण (घनसावंगी), बबनराव लोणीकर, लक्ष्मण पवार (गेवराई), खासदार संजय जाधव (परभणी), निलेश लंके (अ.नगर) यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

निवेदनात हेही नमूद आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अनुसूचित जाती व जमातीसाठीच आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यामुळे इतर कुठल्याही समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश हा घटनाबाह्य व संविधानाच्या विरोधातील असल्याचा ठाम दावा करण्यात आला आहे. बंजारा समाजाच्या बेकायदेशीर मागणीमुळे संपूर्ण आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून, यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता आहे.

संविधानाच्या विरोधात कोणतीही हालचाल झाल्यास महाराष्ट्राचा नेपाळ होण्यास वेळ लागणार नाही, अशा तीव्र शब्दांत इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. तसेच, बंजारा समाज अथवा इतर कोणत्याही समाजाला एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कोणतीही कृती केली, तर एकलव्य संघटना राज्यभर आंदोलन उभारेल व त्यास होणाऱ्या परिणामांसाठी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सदर निवेदनात बापू मोरे यांच्यासह चंद्रकला मोरे, भवसिंग सोनवणे, विनायक धुडकू सोनवणे, राजधर ठाकरे, धनराज गुलाब मालाचे, भगवान संदानशिव, अमर सोमा भिल, ओंकार माळी आणि आधार रूपलाल पवार यांची सह्ये आहेत


Protected Content

Play sound