एसटी बसची कारला धडक; भूमि अभिलेख अधिकाऱ्यांचा मृत्यू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई-पुणे महामार्गावर खडकी रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. एसटी बसने एका चारचाकी कारला समोरून दिलेल्या धडकेत भूमि अभिलेख विभागात उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिका-याचा मृत्यू झाला. महिला अधिकारी पुढच्या काचेवर आदळल्याने ती जागीच ठार झाली. मृत महिलेशिवाय तिचे पती, भाऊ, आणि बसमधील अन्य प्रवासी असे चौदा जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा विजयसिंह भोसले असे मृत्यू झालेल्या अधिकारी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बसचालक अनंत पंजाबराव उईके याला ताब्यात घेतले आहे. मनीषा भोसले, त्यांचे पती आणि भाऊ रविवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास कारमधून हडपसरकडे जात होते. त्यांचा भाऊ गाडी चालवित होता. तर पती चालकाशेजारील सीटवर बसले होते. मनीषा चालकाच्या मागील सीटवर बसल्या होत्या. त्यांची कार खडकी रेल्वे स्थानक परिसरात आली, तेव्हा समोरून येणा-या एसटी बसने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. त्यात गाडीतील तिघे जखमी झाले. मनीषा गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पती आणि भावावर उपचार सुरू आहेत.

Protected Content