जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एस टी महामंडळ जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक व इतर अधिकाऱ्यांकडून आरटीओ नियमांचे उल्लंघन गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असल्यामुळे गोंदिया येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नरेश जैन यांनी गंभीर स्वरूपाची तक्रार केलेली होती.
या तक्रारीनुसार जळगाव विभागाचे एसटी अधिकारी आपल्या खाते वाहनांवर महाराष्ट्र शासन असे लिहून शासनाची फसवणूक करीत असून सरकारच्या महसूल बुडवीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असे नरेश जैन यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले होते.
यापूर्वी अनेकदा परिवहन खात्याचे अधिकाऱ्यांकडून एसटी विभाग नियंत्रक भगवान जगणोर यांना सूचना केल्या गेल्या होत्या. परिवहन उपयुक्त सुभाष धांडे यांनी देखील उपप्रादेशिक अधिकारी यांना लिखित आदेश दिलेले होते. त्याचप्रमाणे वृत्तपत्रांमध्ये देखील महाराष्ट्र शासनाच्या उल्लेखाबद्दल बातम्या प्रसारीत झाले होत्या. परंतु एसटीच्या अधिकाऱ्यांनी मात्र महाराष्ट्र शासना नावाच्या खाली ‘अंगीकृत उपक्रम’ असे टाकून वेळ मारून नेली.
गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार करून संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केली. या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कार्यालयीन आदेश प्रसारित करून एसटी महामंडळाच्या वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रम’ असे लिहिलेले असेल त्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विभाग नियंत्रक, मुख्य यंत्र अभियंता यांच्यासह मार्ग तपासणी पथकाच्या वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.