Home Cities यावल यावल नगरपालिकेच्या प्रभाग ८ब मध्ये उत्स्फूर्त मतदान ; दुपारपर्यंत ५० टक्के मतदानाची...

यावल नगरपालिकेच्या प्रभाग ८ब मध्ये उत्स्फूर्त मतदान ; दुपारपर्यंत ५० टक्के मतदानाची नोंद

0
131


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत प्रभाग क्रमांक ८ब साठी आज शनिवारी (२० डिसेंबर २०२५) मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे. राखीव ठेवण्यात आलेल्या या प्रभागातील निवडणुकीकडे शहरासह परिसराचे लक्ष लागले असून नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत.

सातोद रोडवरील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक एक तसेच माध्यमिक कन्या शाळेच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या तीन मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदानास सुरुवात झाली. मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून येत असून शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या प्रभागात एकूण ३ हजार ३४ मतदार असून दुपारच्या दोन वाजेपर्यंत सुमारे ५० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या मतदान टक्केवारीमुळे सायंकाळपर्यंत चांगली मतदान टक्केवारी नोंदवली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी मतदान केंद्र परिसरात उपस्थित राहून मतदारांना मतदानात सहभागी होण्याचे आवाहन करताना दिसून आले. महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सागर कुमार चौधरी यांच्या समर्थनार्थ भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. छाया पाटील यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय होते.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोविंद मधुकर बारी यांच्या प्रचारासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश फेगडे, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. रोहिणी उमेश फेगडे, कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आर. जी. पाटील (नाना), भाजपचे माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, सरचिटणीस भरत पाटील व ज्ञानेश्वर तायडे तसेच शहर अध्यक्ष राहुल बारी यांनी मतदान केंद्राबाहेर उपस्थित राहून मतदारांशी संवाद साधला.

एकूणच यावल नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ब मधील निवडणूक शांततेत आणि उत्साहात पार पडत असून वाढता मतदान प्रतिसाद पाहता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound