पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पारोळा शहरात राबविण्यात आलेल्या जनजागृती अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक असून, याच संदेशाचा जागर नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासनाद्वारे प्रभावी उपक्रम राबवले जात आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उल्हास देवरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल पाटील तसेच अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कार्यालय अधीक्षक तथा प्रशासनाधिकारी श्रीमती यामिनी लक्ष्मण साजटे यांच्या मार्गदर्शनामुळेही उपक्रमाला आवश्यक ती गती मिळाली असून, नागरिकांमध्ये जागरुकतेची भावना वाढताना दिसत आहे.

या मोहिमेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सोमा महाजन, शहर समन्वयक शुभम दिनेश कंखरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, भागीरथी महिला शहर संघाच्या अध्यक्षा सौ. मनीषा चौधरी, उपाध्यक्षा सौ. अर्चना पाटील, सचिव सौ. पूनम पाटील यांच्यासह सौ. तेजस्विनी चौधरी, सौ. योगिता चौधरी, सौ. सुनीता चौधरी आणि अन्य महिलांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. बचत गटातील महिलांनी शहरात रॅली, घराघर संपर्क आणि जनहिताचे संदेश देत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामुळे पारोळ्यातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरुकता वाढली असून, युवापिढीपासून वरिष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच स्तरांत उत्साह दिसत आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पारोळा शहरात मतदानाचे प्रमाण लक्षणीय वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



