एरंडोल (प्रतिनिधी) तापमानात होणारी वाढ, वाढते प्रदुषण, बेसुमार होत असलेली वृक्षतोड व वृक्ष लागवडीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पावसाचे कमी झालेले प्रमाण याबाबत समाजात जनजागृती करून, वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्यासाठी शहरातील युवकांनी एक मोहीम सुरु करून प्रत्यक्ष कार्यास सुरुवात केली आहे.
या उपक्रमात शहरातील विविध समाजिक संस्था व विविध घटकातील महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन उस्फुर्त सहभाग घेतला आहे. सदर उपक्रमात सहभागी युवकांच्या भूमिकेचे सर्वच स्तरातुन स्वागत करण्यात येत आहे. या उपक्रमात शहरातील अनेक लोक स्वयंस्फुर्तीने सहभागी होत आहेत. या उपक्रमात शहरातील प्रसिद्ध बासरीवादक योगेश पाटील, आरोग्य सेवक केशव ठाकुर, डॉ.शेखर पाटील यांचेसह अनेक युवकांनी व महिलांनी एकत्र येऊन यावर्षी झालेल्या तापमान वाढीवर व पावसाचे कमी झालेले प्रमाण या विषयांवर चर्चा करून शहरात सुमारे पाच हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संपुर्ण संवर्धन करण्याबाबत नियोजन करावे, असा निर्णय घेतला आहे.
वृक्षारोपण जनजागृतीसाठी या युवकांनी व्हाटसअप गृप तयार करून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनास शेकडो पर्यावरण प्रेमी नागरिक व महिलांनी प्रतिसाद दिल्यामुळे या युवकांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे. त्यांनी शहरातील विविध नवीन वसाहतींमध्ये रहिवाशांची कॉर्नर सभा घेऊन या उपक्रमात कशा पद्धतीने प्रत्यक्ष काम करावयाचे याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे.