सावदा– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘युवा संकल्प अभियान’ अंतर्गत फैजपूर शहरात एक अभिनव उपक्रम सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झालेल्या विकासात्मक कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल वाहनाच्या माध्यमातून व्हिडिओ प्रेझेंटेशन दाखवण्यात आले. या उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी थांबून व्हिडिओ पाहत माहिती घेतली.

या अभियानामध्ये विशेषतः तरुण वर्गाचा सहभाग लक्षणीय होता. व्हिडिओ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शेती, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, जलसंपदा प्रकल्प अशा विविध क्षेत्रांतील अजित पवार यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. हे सादरीकरण शहराच्या विविध ठिकाणी फिरवण्यात आले, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती सहज पोहोचू शकेल.

कार्यक्रमाच्या आयोजनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नासिर भाई, माजी प्रभारी नगराध्यक्ष शेख कुर्बान, भूपेंद्र सोनवणे, फैजपूर शहराध्यक्ष कृष्णा चौधरी, मागासवर्गीय नेते अशोक भालेराव, मॉन्टी केरोसिया, पप्पू मेढे, रोशन सपकाळे, काशीफ शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या सर्वांनी नागरिकांशी संवाद साधत, अभियानाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. स्थानिक पातळीवर या उपक्रमामुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. पक्षाच्या विचारधारेविषयी सकारात्मकता निर्माण करत, हे अभियान जनतेमध्ये चांगले पोहचत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अशा डिजिटल मोहिमेमुळे मतदारांपर्यंत थेट पोहोचून विश्वास वाढवण्यास मदत होत असल्याचे मत अनेकांनी नोंदवले.



