जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक भक्तिमय करणाऱ्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन श्री गणाधीश फाउंडेशन मित्र मंडळातर्फे भोईटे नगर रोडवरील गौरी प्राईड परिसरात मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. एक फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही संगीतमय भागवत कथा आठ फेब्रुवारीपर्यंत दररोज दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत भाविकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
या ज्ञानयज्ञाचा प्रारंभ रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी भव्य ग्रंथ मिरवणूक व कलश यात्रेने करण्यात आला. परिसरातून निघालेल्या या मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर कलश घेतले होते, तर पुरुष, युवक व बालगोपालांनी हरिनामाच्या जयघोषात सहभाग नोंदविला. मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला असून धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीमद् भागवत कथेचे प्रवचन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, देवपूर (धुळे) येथील सुप्रसिद्ध कथा प्रवक्त्या परमपूज्य स्वामी ताई आपल्या मधुर व ओघवत्या वाणीतून सादर करीत आहेत. त्यांच्या संगीतमय शैलीतील कथाकथनामुळे भागवताचे तात्त्विक ज्ञान सहजपणे भाविकांपर्यंत पोहोचत असून कथा ऐकण्यासाठी परिसरासह शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत.
या कथाकाळात भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचे, भक्ती, ज्ञान व वैराग्याचे महत्त्व प्रभावीपणे उलगडले जात आहे. विशेष आकर्षण म्हणून गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी अत्यंत भक्तिभावात श्रीकृष्ण विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी भाविकांची विशेष गर्दी होण्याची शक्यता आहे.
या धार्मिक उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री गणाधीश फाउंडेशन मित्र मंडळाच्या वतीने आयोजक रविंद्र बाबुराव सोनार व पवन सोनार यांनी केले आहे. कथास्थळी शांतता, शिस्त व भक्तिभाव राखत हा अध्यात्मिक सोहळा अनुभवावा, असेही त्यांनी नमूद केले.



