पारोळा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा परिसरातील मुली आणि महिलांमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने लाडशाखीय वाणी समाज संस्कृती महिला मंडळातर्फे ‘लाठी-काठी’ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. आधुनिक काळात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रशिक्षणाची गरज अधिक भासू लागल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले.

महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा पुरकर यांनी या प्रशिक्षणाची संकल्पना मांडून आयोजनाची धुरा सांभाळली. प्रशिक्षक रोहिणी फंड यांनी सहभागी मुली व महिलांना लाठी-काठीचे प्रत्यक्ष आणि मूलभूत प्रशिक्षण दिले. लाठी-काठी हा पारंपरिक मर्दानी खेळ असला तरी स्वसंरक्षणासाठी तो अत्यंत प्रभावी साधन ठरू शकतो, याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवून दिले. प्रशिक्षणादरम्यान काठीचा वापर, त्यातील तंत्र, संतुलन आणि वेग यांची माहिती देण्याबरोबरच त्यांनी व्यायाम आणि योगाचे महत्त्वही अधोरेखित केले.

या प्रशिक्षणामुळे शारीरिक क्षमता, चपळता, संतुलन, आत्मविश्वास आणि प्रतिक्रीया देण्याची क्षमता प्रभावीपणे वाढते, असे प्रशिक्षकांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या मुलींमध्ये समीक्षा कोठावदे, सिद्धी कोठावदे, स्वरा बधान, अनघा नावरकर, पूर्वा नावरकर, अनन्या शेंडे, कोमल टिपरे यांनी लाठी-काठीचे तंत्र उत्तम प्रकारे आत्मसात केले. भगिनींपैकी रेखा कोठावदे, साधना कोठावदे, शोभा बधान आणि वैशाली अमृतकार यांनीही उत्कृष्ट सहभाग नोंदवत स्वसंरक्षण कौशल्य आत्मसात केले. प्रशिक्षक रोहिणी फंड यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करत, “माझी सुरक्षा माझ्या हाती” हा प्रशिक्षणाचा मंत्र आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुयोजित नियोजन वर्षा कोठावदे, निता नावरकर, योगिता येवले आणि विद्या येवले यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन माधुरी अमृतकर यांनी केले. प्रशिक्षणानंतर महिला वर्गातून अशा उपक्रमांचे ठिकठिकाणी नियमित आयोजन करण्यात यावे, अशी मागणी मोठ्या संख्येने व्यक्त करण्यात आली.



