Home Cities रावेर धनाजी नाना महाविद्यालयात ‘फ्रॉम कॅम्पस टू कंपनी’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

धनाजी नाना महाविद्यालयात ‘फ्रॉम कॅम्पस टू कंपनी’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
158


फैजपूर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात ‘फ्रॉम कॅम्पस टू कंपनी : अ स्टार्टअप पाथवे’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तापी परिसर विद्या मंडळ संचलित KIEDC समिती, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत कार्यरत सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस (KCIIL) यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.

ही कार्यशाळा तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी, संचालक मंडळ व प्राचार्य डॉ. राजेंद्र बी. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्लेसमेंट सेलचे चेअरमन आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डि. बि. तायडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून KCIIL चे CEO डॉ. नविन खंडारे आणि कार्यक्रम समन्वयक रोशनी जैन उपस्थित होते. स्थानिक KIEDC समितीचे प्रमुख प्रा. डॉ. हरीश नेमाडे व समन्वयक प्रा. डॉ. योगेश तायडे यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यशाळेतील प्रमुख वक्ता डॉ. नविन खंडारे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये उद्योजकतेची बीजे असतात. गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची व त्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याच्या इच्छाशक्तीची. समाजातल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सर्जनशीलतेचा वापर करून स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करावी. “नोकरी फक्त गरजा पूर्ण करते, पण उद्योजकतेमुळे तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता” असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बना, असे आवाहन केले.

प्रास्ताविक प्रा. डॉ. योगेश तायडे यांनी करताना जगप्रसिद्ध स्टार्टअप्स – उबेर, ओला, स्विगी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांचा उल्लेख करत त्यांची प्रेरणादायी उदाहरणे दिली. यासोबतच आपल्या परिसरातही काही तरुणांनी यशस्वी उद्योग सुरू केल्याचे सांगत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नवीन कल्पनांवर काम करून स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. डि. बि. तायडे यांनी आपल्या परिसरातील कृषी आधारित संसाधनांचा उल्लेख करत, शेतीतील टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ उत्पादने तयार करण्याच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्थानिक उत्पादनांवर आधारित स्टार्टअप संकल्पनांची उदाहरणे देत, विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना महाविद्यालयाच्या KCIIL विभागात मांडण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. हरीश नेमाडे यांनी केले. या यशस्वी कार्यक्रमासाठी प्रा. वसुंधरा फेगडे, प्रा. सुजित भाट यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी संयोजनात मोलाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound